लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका. सतर्क राहा आणि काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत पहायला मिळाले. भाजपहा महायुतीत मोठा भाऊ आहे. त्यामुळे भाजपलाच जास्त जागा मिळतील असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्यावर छगन भुजबळांनी पुन्हा वक्तव्य केले भुजबळ म्हणाले की, राजकीय वाद करणे योग्य नाही. माझ्या पक्षाची बैठक सुरू होती. त्यामध्ये आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही महायुतीमध्ये येणार होतो. त्यावेळी आम्हाला खासदारकी आणि आमदारकीच्या जागा सांगितल्या होत्या. त्यावेळी जी चर्चा झाली त्याची आठवण मी करून दिली आणि त्याची काळजी घ्या असं मी सांगितलं. बाकी काही नाही. भाजप हा आमच्या महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. एवढा काही मी मूर्ख नाही की त्यांना कमी आणि आम्हाला जास्त जागा द्या असे सांगायला,” असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळांनी दिले.
दरम्यान भुजबळांवर भाजप नेते निलेश राणे यांनीही पलटवार केला आहे. छगन भुजबळांना आवरा असे त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे. 400 पारच्या नाऱ्याचा त्रास झाला. मोदी संविधान बदलणार नाहीत हे सांगताना दमछाक झाली असे वक्तव्यही भुजबळांनी केले होते. त्याचा समाचार राणे यांनी घेतला. नेहमी आम्ही भुजबळांचे का ऐकून घ्याचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय भुजबळांच्या वयाचा आम्ही आदर करतो, पण युती बिघडवण्याची भाषा कोणी करत असेल तर ते सहन होत नाही असेही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले होते की, भुजबळांना अशा प्रकारची विधाने करून महायुतीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. जागावाटपाबाबत महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतील. युतीच्या अटी लक्षात ठेवा,बाहेर तुम्हाला असे विधान करून काय सिद्ध करायचे आहे. राष्ट्रवादीला जागावाटपासंदर्भात इतकी घाई का आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून ४ महिने बाकी आहे. त्यामुळे निवडणुका आल्या का बघू, या विषयावर आज बोलणे योग्य नाही.
