शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चावर आता सोनिया दुहान यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी शरद पवारांचा गट सोडला नाही. ते आमचे दैवत आहेत आणि दैवत राहतील’ अशी भूमिका सोनिया दुहान यांनी मांडली आहे. यासह सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप करत आपली खदखद व्यक्त केली आहे.
शरद पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान म्हणाल्या की, मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर, ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रीया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असं म्हणायचं का? धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील.
सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत –
सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्षाला सोडून जात आहेत, असं वक्तव्य सोनिया दुहान यांनी केलं. नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरू आहे तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, असा गंभीर आरोपही सोनिया दुहान यांनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘मी आजपर्यंत पक्ष सोडला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही.असंही सोनिया दूषण म्हणाल्या.
सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.
