पोर्श अपघात प्रकरणात अखेर 2 डॉक्टर निलंबित; ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या तीन जणांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळसह शिपाई अतुल घटकांबळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं उघडकीस आलंय. पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालने अजय तावरेशी तब्बल 2 तासांत 14 वेळा फोन केल्याचं उघड झालंय. 19 मे रोजी म्हणजेच अपघाताच्या दिवशी सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान एकमेकांना व्हॉट्सअॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून कॉलिंग केल्याचं समोर आलं असून, आता पोलीस या दोघांमधील मध्यस्ती कोण होता? याचा शोध घेतायत.

डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणारा कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केले आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे, असे ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी नमूद केले.

दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं ससून रुग्णालयात दाखल झाली आहेत. ससून रुग्णालयात काम करणारा शिपाई अतुल घटकांबळे याला घेऊन पोलीस ससून रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कोणी बदलले, तसेच रक्ताचे नमुने कोणाचे घेतले गेले, पैसे घेऊन ससून मध्ये कोणी कोणाला दिले या सर्व गोष्टींची चौकशी करण्यासाठी घटकांबळे याला ससून मध्ये आणण्यात आले आहे. घटकांबळे हा शवगृहाचा शिपाई आहे.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते. या समितीने दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याच नमूद केली आहे. डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य केल्याने त्यांच्यावर निलंनाची कारवाई करण्यात आली आहे.