मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

संजय राऊत यांनी सामना दैनिकात रोखठोक या सदरात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले होते. “नितीन गडकरी यांच्या प्रचारात फडणवीस नाईलाजाने उतरले, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले, तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असे अनेक आरोप आणि दावे संजय राऊत यांनी आपल्या सदरात केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावतीने त्यांच्या विधी सल्लागारांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजवाली आहे.

तीन दिवसात माफी मांगा अन्यथा कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप सामनातून करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल.

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
सामनाच्या माध्यमातून बदनामीकारक बातम्या प्रकाशित करून, तुम्ही प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सामनाचे मुख्य संपादक आहात, तुम्ही भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमच्या निहित राजकीय आणि स्वार्थासाठी तुम्हाला बदनामी करण्याची परवानगी नाही. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर पैसै वाटल्याचा आरोप केला होता, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशारा नोटीसच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता एकनाथ शिदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.