केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीं ना टोला लगावला आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य, मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 4 जून नंतर केंद्रात भारतीय जनता पार्टीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाराणसीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना गंगापुत्र म्हणून संबोधित केले.
“मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे राहुल गांधींना स्वप्न पाहु द्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.” असंही ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातल्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी ते पोहचले आहेत. काशी या ठिकाणी काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी काशीत प्रचाराला आलेलो नाही मी लोकांचं प्रेम पाहण्यास आलो आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. आजच नाही कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी (जितेंद्र आव्हाड) फाडला. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
