मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला आहे. मुंबईतील जया शेट्टी हत्याकांडात कुख्यात गुंड छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी गुंड छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
जया शेट्टी या मध्य मुंबईतील गावदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून 50 कोटींच्या खंडणीची मागणी होत होती. खंडणी देण्यास नकार देत, जया शेट्टी यांनी पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षाही दिली होती. मात्र, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. 4 मे 2001 रोजी, जया शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.
छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. त्याला इंडिनेशियामध्ये अटक करुन ऑक्टोंबर 2015 मध्ये भारतात आणले गेले. तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहारमधील जेल नंबर 2 मध्ये आहे. हा सेल उच्च सुरक्षा असणारा आहे. कधीकाळी दाऊद इब्राहीमचा जवळचा असणारा छोटा राजन 1993 मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोटानंतर दाऊद गँगपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात गँगवार होत राहिले होते. छोटा राजनेचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म 13 जानेवारी 1960 मध्ये झाला.
गेल्या वर्षी छोटा राजन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि ‘स्कूप’ या वेब सिरीजचे निर्माते मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीच्या मालकांविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात (एचसी) धाव घेतली होती. आपल्या दाव्यात राजनने चित्रपट निर्मात्याने आपला फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल आक्षेप घेतला होता.
