येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार

देशात एकिकडे तापमानानं पन्नाशीचा आकडा ओलांडलेला असतानाच या प्रचंड उकाड्यामध्ये दिलासा देण्यासाठी मान्सून सज्ज झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा प्राथमिक आणि महत्त्वाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.तसंच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासांत नैऋत्यू मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून 31 मे ते 1 जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं. मात्र, आता एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

हवामान तज्ज्ञांनुसार, रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. या वादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचून घेतला. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यात मान्सून लवकर दाखल होत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला. परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

हवामानातील या बदलामुळे तर चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर राज्यात लवकरच आबादाणी होणार आहे. पूर्वोत्तरमधील अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिजोरम, मणिपूर आणि आसाम या राज्यात पाऊस 5 जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

केरळमधील मान्सूनपूर्व पावसाचे लवकरच मान्सूनच्या पावसात रूपांतर होईल, असं आयएमडीनं म्हटलं होतं. हवामान खात्यानं आज कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांत रेड अलर्ट तर इतर तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. साधारणपणे ते एका लाटेसह उत्तरेकडे सरकते आणि 15 जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापते. याआधी 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता. या वेळी मान्सून नेहमीपेक्षा 3 दिवस आधी म्हणजे 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला.