जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं, भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला. त्याविरोधात बुधवारी महाडमधील चवदार तळं इथं आव्हाडांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद फाडला गेला आणि त्यावरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय.

जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर उतरलं असून काही ठिकाणी गुन्हाही दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करावाई करावी अशी मागणी केली जात आहे.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कलम 504 अन्वये शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्या प्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आव्हाडांविरोधात असून गुरूवार सकाळपासूनच राज्यभरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे एकंदर वातावरण खूपच तापलेलं दिसत आहे. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून काही ठिकाणी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

कालच्या या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हांडाविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. भाजप नेते, कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, निषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत. ठाण्यातील वसंत विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले तर कोल्हापुरातही जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्यावतीने बिंदू चौकात निदर्शने करण्यात येत आहेत. बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करत हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच त्या ठिकाणीच आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात येत आहे