पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा, सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील केला आहे. सुरेंद्र अगरवाल यांच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर आला. नियम धाब्यावर बसवून विशाल अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकीत हॉटेल उभारलं. विशेष म्हणजे शासकीय जागेत हे हॉटेल उभारलंय. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून हे फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल उभारल्यानं महाबळेश्वर नगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल आल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केला होता. त्याचबरोबर विशाल अग्रवालने स्वत:च्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल दुस-याला त्यानं भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
महाबळेश्वरमधील सिटी सर्व्हे नंबर 233 या सरकारी मिळकत असून ही मिळकत पारशी जिमखाना या ट्रस्टला 30 वर्षांच्या कराराने देण्यात आली. या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यात आलं. 2016 मध्ये पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि उषा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना घेण्यात आले आहे. त्यानंतर केवळ चार वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या या सर्व ट्रस्टींची नावे कमी झालीत. त्या ठिकाणी विशाल अग्रवालच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली.
विशाल अग्रवाल हा पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडिल आहे. पुणे कार अपघात प्रकरणात पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आजोबालाही अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र आणि विशाल अग्रवालने धमकावून मुलाचा गुन्हा अंगावर घे अशी बळजबरी केल्याची तक्रार ड्रायव्हरने दिलीय…
