राज्यात पब आणि बारमध्ये 7 कठोर नियम लागू होणार

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत आहे. दोन आठवड्यापूर्वी नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून बाईकला धडक दिली व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांचे व्हिडीओही समोर आले होते. अल्पवयीन मुलांना दारू दिलीच कशी असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या हिट अँड रन प्रकरणानंतर नियमांचे उल्लघंन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे.. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकी मध्ये पुणे सारखे प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

कोणती कारवाई, काय असतील नियम?
१) परवाना कक्षा मध्ये 21/25 वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार

२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.

३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार

४) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना

४) महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.

५) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.

६) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-1 ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.

७) या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.