पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं; विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली

पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली सापडली आहे. त्यामध्ये पुरातन मुर्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री 2 वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे. दरम्यान, आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम पाहणी करणार आहे.

सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली आढळून आली आहे. ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे. यामध्ये आत मूर्तीसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आज रात्री पुरातत्व विभागाची टीम आत उतरणार आहे. या खोलीत नेमकं काय आहे ह पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.

आषाढी एकादशीला काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठलभक्तीची ओढ पृथ्वीच्या या वैकुंठाला खुणावतान दिसत आहे. यंदाची आषाढी किंबहुना इथून पुढं सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रुप न्याहाळणं एक खास अनुभूती देऊन जाणार आहे. कारण, जवळपास 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरुप नुकतंच समोर आलं आहे. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतंच मंदिर समितीनं या मंदिराची सुरेख झलक सर्वांपुढे आणली. मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुने रुप समोर आणले जात आहे. मार्च महिन्यापासून विठ्ठल मंदिरातील चरणस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. ज्यानंतर आता संवर्धनाचं काम बहुतांशी पूर्ण झालेलं असताना 2 जूननंतर गाभारा आणि मुख्य गाभाऱ्यात भाविकांना विठ्ठलाचं साजिरं रूप जवळून न्याहाळता येणार आहे.