राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरलं जातं. राज्यातील परकीय गुंतवणूक घटली आहे. परदेशातील उद्योग अन्य राज्यांत जात आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जातो. तर राज्यातील परकीय गुंतवणूक वाढली आहे. आगामी काळातही अनेक उद्योग राज्यात येतील, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असं समाजमाध्यमावरून सांगितलं आहे. तशी आकडेवरीच फडणवीसांनी प्रसिद्ध केली आहे.
‘बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते’, असा टोला विरोधकांना लगावत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. “एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये प्रथम क्रमांकावर राहिल्यानंतर आता २०२४ या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षांत : 1,18,422 कोटी आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत : 1,25,101 कोटी या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदनही केले आहे.
