वरुणराजा बरसणार; केरळनंतर ‘या’ मार्गाने मान्सून महाराष्ट्रात धडकणार

दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे. हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी पोहोचतो, परंतु यावेळी तो 30 मे रोजी दाखल झाला आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात. वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार असल्याच हवामान खात्याने म्हटलं आहे.

‘मान्सूनचा पॅटर्न कधीच सारखा नसतो’, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर पर्यावरणीय परिस्थितीनुसार मान्सूनचा पॅटर्न बदलत राहतो. ज्याप्रमाणे केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. तर यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे.दरम्यान, येत्या दोन तीन दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सूनचा आणखी विस्तार होण्यास अनुकूल परिस्थिती असल्यामुळे खाली दिलेल्या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान केरळमध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस होत आहे. शिवाय मे महिन्यात तुलनेत केरळमध्ये जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान इशान्य भारतात 5 जून पर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज आहे. आठवड्याच्या उर्वरित दिवसांमध्ये, नैऋत्य मान्सून दक्षिण भारताच्या उर्वरित भागांमध्ये आणि पूर्व भारतातील आणखी काही भागात पसरू शकतो.