पाकिस्तानातून शस्त्रं आणून सलमान खान याच्यावर मोठ्या हल्ल्याचा कट; चारजण अटकेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पनवेल पोलिसांनकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. या चौघांनी सलमान खानच्या कारवर पनवेलमध्येच हल्ला करण्याचा कट आखला होता. या कटाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे.

अभिनेता सलमान खानच्या कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई गँगने आखली होती. बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार या दोघांनी पाकिस्तानच्या एका बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून एके ४७, एम १६ यांच्यासह अत्याधुनिक बंदुका खरेदी केल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रात पाठवून त्याच्या कारवर हल्ला करुन त्याला ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर जो हल्ला झाला, त्याआधी बिश्नोई गँगने हा कट आखला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धनंजय उर्फ ​​अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ ​​न्हवी, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ ​​जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एक महिन्यापूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्यांची नावे होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनुज थापनला पंजाबमधून अटक करण्यात आली. यानंतर १ मे रोजी मुंबई पोलिसांच्या लॉकअपमध्ये थापनचा मृत्यू झाला.