निकालाआधी राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या अडचणीत वाढ; अर्चना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

आज लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर या मतदानाचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचेच लक्ष चार जूनच्या तारखेकडे लागले आहे. तर दुसऱ्या बाजूला निकालाची तारीख आणि वेळ जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींचा वेग ही वाढला आहे. मात्र अशातच अजित पवार गटाच्या महिला उमेदवाराच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या महिला उमेदवाराच्या विरोधात थेट गुन्हा दाखल झाला आहे.

निवडणूक प्रचारात एकमेकांवर हल्लाबोल करणारे नेते आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणूक प्रचारकाळातील घटनांवर कारवाई होताना दिसून येते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना सभा घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्यावर प्रचारसभेच्या तब्बल 43 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अर्चना पाटील यांनी रॅली काढली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यावेळी अर्चना पाटील यांच्या रॅलीला परवानगी होती. मात्र अजित पवारांच्या सभेला परवानगी नव्हती. विनापरवाना अजित पवारांची सभा घेतल्याने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आता अखेर 43 दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे.धाराशिवच्या आनंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 188, 34 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचारादरदम्यान उमेदवारी अर्ज भरताना महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावतीने केवळ रॅलीचीच परवानगी काढण्यात आली होती. मात्र, सभेची कुठलाही परवानगी त्यांनी काढली नव्हती. तरीही रॅलीनंतर जाहीर सभा घेण्यात आल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवार अर्चना पाटील आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यां दोघांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती.