कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा

जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र वाढता उन्हाचा कडाका पाहता मान्सून आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात कुठं उष्णतेची लाट, तर कुठं उष्ण आण दमट स्थितीच पाहायला मिळणार आहे.

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. विदर्भात ब्रह्मपुरी इथं तापमान 46.9 अंशांवर पोहोचलं असून त्याचा दाह सोसेनासा झाला आहे. हवामानाची ही स्थिती पाहता सध्या कोकणात दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून उष्णतेचा दाह वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 48 तासांमध्ये मान्सून अरबी समुद्रासह केरळ, अंदमानचा उर्वरित भाग यांसह कर्नाटक आणि लक्षद्वीपचा काही भाग व्यापत बंगालच्या उपसागरात प्रवेश करेल. केरळात मान्सूननं आणखी जोर पकडल्यानंतर तो साधारण 8 ते 10 दिवसांत पुढे कूच करत कोकणमार्गे महाराष्ट्राच्या वेशीत प्रवेश करेल.