आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा मी अमोल मिटकरी यांच्याबाबत बारामतीमधील एका सभेत घेतला होता, अशी माहिती भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणे, हे आपले काम आहे. पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही, असंही खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
खासदार कुलकर्णी म्हणाल्या, मी इथे सत्कार घ्यायला आले नाही तर जिथे आपल्याला त्रास होत असेल तेथे ब्राम्हण समाजाने व्यक्त झालं पाहिजे, हे सांगायला आले आहे. आपल्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळी टीका होते. आपल्याबद्दल नकारात्मकतेची मोठी भावना असते. ती नकारात्मकता आपल्या वर्तणुकीतून नाहीशी करण्याचा प्रयत्न करणं हे आपले काम आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे न्यायचं आहे.असंही त्या म्हणाल्या आहेत.
देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत. देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचं आहे. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असं आवाहनही कुलकर्णी यांनी केलं. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असा इशाराच मेधा कुलकर्णी यांनी दिला. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा असंही त्या म्हणाल्या आहेत.
