पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणी आता ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या आईच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं कारवाई करत शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे. ब्लड सॅम्पल फेरफार आणि ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या आईने रक्त दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात तिचा काही सहभाग आहे का? याचा तपास केला जाणार आहे. यापूर्वीच पोलिसांनी शिवानी अग्रवालची चौकशी सुरु केली होती. आता तिला गुन्हे शाखेने अटक केली आहे.अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचं उघड झाल्यावर शिवानी अग्रवाल काही काळ बेपत्ता झाल्या होत्या, मात्र अखेर आज पुणे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान आज सकाळी 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर पुणे पोलिस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलीस शनिवारी चौकशी करणार आहेत. बालहक्क न्यायमंडळाकडून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळाली असून त्यानंतर शनिवार (1 जून 2024) रोजी पुणे पोलीस दोन तास त्याची चौकशी करतील. पालक उपलब्ध नसल्यानं बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होईल असं म्हटलं गेलं होतं. पण, शिवानी अग्रवालवर अटकेची कारवाई झाल्यानंतर तिला बाल निरीक्षण गृहात नेणार असल्याची माहिती आहे. आज मुलाची चौकशी होणार असल्या कारणानं त्यावेळी पालक सोबत असण्याची गरज पाहता हा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
