लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला. भाजपसह महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. निकालानंतर भाजपने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक असं विधान केलं. वरिष्ठ नेत्यांकडे आपण मला सरकारमधून आजच मोकळं करा अशी विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका निवडणुकीने सगळं संपत नाही, आम्ही यापुढे एकत्रच काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्रजींनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. ‘निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. जी निवडणूक झाली त्यात मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोटं बोला रेटून बोलं या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले. मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो.असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
