पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज (दि.५) पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस त्यांनी राष्ट्रपतींकडे केली. पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असून ते आज सायंकाळी एनडीए आघाडीच्या बैठकीनंतर पाठिंब्याचे पत्र घेऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार होते. मात्र दुपारीच राष्ट्रपतीची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रपती भवनात दाखल होत असताना त्यांच्यासोबत दुसरा नेता नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे. मोदी पंतप्रधान पदाची शपथ याच आठवड्यात घेऊ शकतात अशी माहिती मिळत आहे. याआधी मोदी ९ जूनला शपथ घेणार अशी चर्चा होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या राजीनाम्याची माहिती देतील. त्यानंतर एनडीएचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दहा वर्षांपासून देशात सत्ता असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला होता. दोन वेळा बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताने हुलकावणी दिली. मागच्या वेळी ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी २४० जागा मिळाल्या आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखील एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपाकडे स्वत:चं बहुमत नसल्याने भाजपासमोर सत्तास्थापनेसाठी अडचणी अडचणी येतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
