पुणे पोर्शे कार प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर; आणखी दोन जणांना अटक

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही पोर्शे कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या घटनेनंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.

विशाल अग्रवालचा मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचं मुंबई कनेक्शन समोर आले आहे. पुणे पोलिसांनी मुंबईतून आता दोघांना अटक केली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अशपाक मकानदार, अमर गायकवाड अशी दोघांची नावे असून त्यांना पुणे क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. या दोघांची आता पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

डॉ अजय तावरेच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ, अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली, रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली, आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोघांवर आहे. त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अवघ्या तीन लाख रुपयांसाठी अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना अटक झाली आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणात मकानदार आणि गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.