गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला लोकसभेचा निकाल अखेर समोर आला आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपला 240, काँग्रेस 99, समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29, डीएके 22, तेलुगू देसम 16, जनता दल 12, शिवसेना 9, शरद पवार गट 8, शिंदे गट 7 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीएला 293 आणि इंडिया आघाडीला 229 जागा मिळाल्या आहेत. प्रथमदर्शनी पुन्हा एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसत असलं, तरी यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीकडून चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार यांची मदत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
आज दोन्ही आघाडींची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांच्या विजयी खासदारांना दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्ली आज देशातील मोठ्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान बनणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांची कामगिरी चांगली असल्यामुळे तसेच काँग्रेस किंवा भाजपा यांपैकी कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील.
भाजपच्या वरिष्ठ नेते मित्र पक्षांची चर्चा करत आहेत. तर काल रात्री अमित शहा यांनी मित्र पक्षाशी संवाद साधला आहे. त्यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे या चर्चेतून समोर आले. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रां दिली आहे.आज रात्री राष्ट्रपतींकडून डिनरच आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्री डिनरला जाणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून समारोपीय डीनरचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीचीही आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची साथ कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आम्ही एनडीएमध्येच राहू – चंद्राबाबू नायडू
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, काळजी करू नका. तुम्हाला बातमी हवी आहे. देशात अनेक राजकीय बदल होताना मी पाहिले आहेत, पण मी एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला जात आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीत टीडीपीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि आम्ही एनडीएमध्येच राहू असं स्पष्ट केलं आहे.
