प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीनं सीजे हाऊसमधील मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीयेथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत जवळपास १८० कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर येते आहे. आता प्रफु्ल्ल पटेल यांच्या घरावरील ईडीची जप्ती उठली आहे.

ईडीने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गॅंगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप केला होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्दी केली आहे.

ईडीनं कारवाई केलेल्या मालमत्तेतील दोन मजले इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाचे होते, असा आरोप करण्यात आला. ही मालमत्ता आधीच ईडीनं जप्त केली होती. ही मालमत्ता व्यावसायिक वापरात होती. इक्बाल मिर्चीसोबत करार करुन ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. अर्थात प्रफुल पटेल यांनी हा आरोप फेटाळून लावला. ईडी पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर 2019 मध्ये प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात आली.

कोरोनानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटा वेगळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असे गट तयार झाले. त्यानंतर महायुतीचं सरकार बनलं गेलं. तेव्हा अजित पवार गटाला प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिली. त्यानंतर ईडीने नुकताच प्रफुल्ल पटेल यांना दिलासा दिल्याचं समजतंय.