राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला. या विजयामुळे हे तिघे ही आता लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतील. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त होतील. गोयल आणि राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय योग्य ठरल्याचे निकालातून दिसून आले. यापूर्वी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. भाजपकडून यावेळी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. गेल्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभ केला. मात्र यावेळी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना राज्य सभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी 25 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्याविषयीची घोषणा केली आहे. केरळमधील तीन जागा तर राज्यातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. केरळमधील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी ते तिघे 1 जुलै रोजी निवृत्त होतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
