विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज ठाकरे यांच्या सोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. ही राजकीय भेट नव्हती, असे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. ( There was no political meeting with Raj Thackeray, explains Uday Samant)
सामंत यांनी शनिवारी सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
पुण्यात विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले होते. त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली.
ते म्हणाले, राज ठाकरे असं व्यक्तीमत्व आहे, राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते. या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. त्यांच्यासमवेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात. तर गप्पानुरुप चर्चा, मराठी भाषेसह उद्योजकांवर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी मी मंत्री म्हणून पुढाकार घेण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून मार्गदर्शन घेतले.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध काही दिवसांपूर्वी ताणले गेले होते. राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती.
