छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वाधिक बदनामी नेहरूंकडून, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? आहे का हिंमत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे पंडित नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. छत्रपतींच्या विरुद्ध सगळ्यात जास्त पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ( (Chhatrapati Shivaji Maharaj was most defamed by Nehru, attack by Devendra Fadnavis)

विरोधकांनी राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारला. “अबू आझमींचा आम्ही निषेध केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं. पण त्याचबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे अजून मोकाट कसे? अबू आझमींना एक न्याय आणि या दोघांना वेगळा न्याय असं कसं चालेल?” असा सवाल काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचा दाखल देत काँग्रेसला सवाल केला. या पुस्तकात महाराजांची बदनामी करण्यात आलेली आहे, असा आरोप त्यांनी केला. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, त्याला सोडलं जाणार नाही असा इशारा देऊन फडणवीस म्हणाले, महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही १०० टक्के जेलमध्ये टाकू. या कोरटकरनं कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर मी वरच्या कोर्टात जायला सांगितलं आहे. पण हे कोरटकर तर चिल्लर लोक आहेत. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलले? त्याचा कधी निषेध केला नाही तुम्ही. जितेंद्र आव्हाड म्हणतात औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते? औरंगजेब बलाढ्य होता, महाराज पाच फुटांचे होते हे रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध का केला जात नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *