बीड : सध्या सोशल मीडियावर काहीही आले की त्याच्यावरून थेट सरकारला प्रश्न करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बीड जिल्ह्यातील एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला. त्यात एकाला मारहाण होत आहे. हा व्हिडिओ कधीच आहे, कोठला आहे, घटनेबाबत तक्रार झालीय का याची काहीही माहिती नसताना त्यावरून थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना सवाल करण्यात आला आहे. (Social media person, video from one and a half years ago, no complaints and questions to the Chief Minister)
बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. कुख्यात गुंड व भाजपा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस व आमदार सुरेश धस यांनी उत्तर द्यावे की हे काय आहे? हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यातील गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडीओ पाहा. याप्रकरणी अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आमदार सुरेश धस यांनी मारहाण करणारा सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचं धस यांनी मान्य केलं आहे. ते म्हणाले, “ सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दिड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा.
