विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. (Marathi is the official language of Mumbai, Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis said)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलं पाहिजे असं नाही, असे विधान केले होते विधानसभेत भैय्याजी जोशी यांच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या बाबती आपली भूमिका काय असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावर ठणकावून उत्तर देताना मुख्यमंत्री साडणवीस म्हणाले, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकून मी त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. मात्र याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भैय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे.
इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भैय्याजी जोशी म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
