मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सीएम डॅशबोर्ड लाँच केले आहे. या डॅशबोर्डद्वारे ते राज्यभरातील योजनांची प्रगती आणि अधिकाऱ्यांचे कामकाज थेट मोबाईलवरून देखरेख करू शकतील.सर्व सरकारी कामांसाठी सीएम डॅश बोर्ड संकेतस्थळ लवकर अद्ययावत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ( Direct supervision of the Chief Minister over the administration of the state)
फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा. ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
