विशेष प्रतिनिधी
भोर: भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयामागचं कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, “मी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, पण कार्यकर्तेच म्हणू लागले की पक्ष मला सातत्याने डावलत आहे. ( Congress forced me to leave the party regrets Sangram Thopte)
संग्राम थोपटे म्हणाले, “जनतेने मला तीन वेळा संधी दिली. मतदारसंघात विकासकामं केली, पण अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी पक्ष बदलणं आवश्यक होतं. कार्यकर्त्यांच्या बैठकीत हाच निर्णय झाला.”
2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यापासूनचा आपला प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. “तेव्हा मी नवीन होतो, पण विधानसभेत सक्रियपणे काम केलं. 2014 मध्ये पुन्हा निवडून आलो, तेव्हा सत्तेत नव्हतो तरीही काम सुरू ठेवलं. 2019 मध्ये तिसऱ्यांदा संधी मिळाली, पण सरकार अचानक महाविकास आघाडीचं आलं. काँग्रेसला 12 मंत्रीपदे मिळाली. पुणे हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असूनही मला मंत्रिपद मिळालं नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी गप्प बसलो, कारण पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य केला. पण नंतर जेव्हा नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हाही माझ्या अनुभवाची दखल घेतली गेली नाही. एवढं मोठं घटनात्मक पद रिक्त असतानाही मला संधी मिळाली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठीही माझ्याकडे पाहिलं गेलं नाही.”
या सगळ्या गोष्टींचा विचार करता, “पक्षानं मला सोडायला भाग पाडलं,” असं सांगत त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. आता ते भाजपमध्ये प्रवेश करून नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार आहेत.
