विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ब्राउन विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. भारताची बदनामी करण्यासाठी राहुल गांधी परदेशी व्यासपीठ वापरत असल्याने त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. ( Rahul Gandhi once again defames India on a foreign platform)
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात दावा केला की, “व्यवस्थेत काहीतरी गंभीर गडबड आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आता स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र निवडणुकीत संध्याकाळी ५:३० नंतर अचानक ६५ लाख मतांची भर पडली, जी आकडेवारी अशक्य वाटते. इतक्या कमी वेळेत इतके मतदार मतदान कसे करू शकतात? मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते काय?”जेव्हा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली, तेव्हा आयोगाने केवळ नकार दिला नाही, तर कायदाच बदलला आणि अशा मागणीस बंदी घातली.
या वक्तव्यानंतर भारतीय राजकारणात मोठा वादंग उठला आहे. भाजपसह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राहुल गांधींनी परदेशी दौऱ्यावर जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवणे म्हणजे भारताच्या लोकशाहीवर शंका घेणे अशी टीका होत आहे. राहुल गांधी यांनाभारताविरुद्ध बोलण्यासाठी परदेशी जमीनच का हवी असते? लोकशाहीत जनतेच्या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित असते, आरोप करून पराभव झाकण्याचा हा प्रकार हास्यास्पद आहे, अशी टीकाही होत आहे.
महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गत चर्चा सुरू असून या आरोपांना निव्वळ “पराभवाचे निमित्त” म्हणून पाहिले जात आहे. निवडणुकीत भाजपला १३२, शिंदे गटाला ५७ आणि अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. काँग्रेसला केवळ १६, उद्धव ठाकरे गटाला २० आणि शरद पवारांच्या गटाला केवळ १० जागा मिळाल्या.
राजकीय विश्लेषकांचा मत आहे की, पराभवानंतर आत्मचिंतन करण्याऐवजी निवडणूक आयोगावर शंका घेणे ही काँग्रेसची रणनीती जनतेत विश्वास गमावण्याचे कारण बनू शकते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निकालावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीवरच शंका उपस्थित केली. कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून 50 जगांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 50 हजार मतदार जोडल्याचा दावा कॉंग्रेसने केला होता. यावर निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून कॉंग्रेसला 66 पानांचे सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे म्हंटले आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून काँग्रेसला 66 पानी सविस्तर उत्तर पाठवले होते. आयोगाने स्पष्ट केले की, काँग्रेसने केलेले दावे तथ्यहीन आहेत. आयोगाने म्हटले की, जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 50 हजार नवीन मतदारांची भर झाली, परंतु ती केवळ 6 विधानसभा मतदारसंघांपुरतीच मर्यादित होती, 50 जागांवर नव्हे.
काँग्रेसने यापूर्वी मतदान कमी असूनही अधिक दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी असा दावा केला होता की, मतदान संपल्यानंतरही 4-5 टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येते. यावर स्पष्टीकरण देताना आयोगाने सांगितले की, मतदान संपल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी फॉर्म 17C मध्ये उमेदवारांच्या एजंटकडे नोंदवली जाते. या टक्केवारीत कोणताही बदल होणे अशक्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
कॉंग्रेसने अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा दावाही केला होता. नाव वगळण्याच्या प्रक्रियेत सर्व गोष्टींचे पालन करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नोटीस पाठवण्याबरोबरच फील्ड सर्व्हे करून निश्चित करण्यात आले होते की, मतदारांचा मृत्यू होणे, पत्ता बदल, संबंधित पत्त्यावर सध्या राहत नसतील तर अशा मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या या उत्तरानंतर काँग्रेसचे आरोप निराधार ठरले असून, निवडणुकीतील प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा आयोगाने पुन्हा एकदा केला आहे.
