दहशतवादाचे कंबरडे मोडल्या शिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम इशारा

विशेष प्रतिनिधी

मधुबनी (बिहार) : “दहशतवाद हे भारताच्या आत्म्यावर झालेलं हल्ला आहे. या भ्याड कृत्यांचा बदला घेतल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देत देश आणि जगाला इशारा दिला. ( India will not rest until the backbone of terrorism is broken PM Narendra Modi warns firmly)

बिहारच्या मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच या हल्ल्यावर जाहीर भाष्य केलं. आपल्या भाषणात त्यांनी हल्ल्यात बळी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थितांना दोन मिनिटं शांतता पाळण्याचं आवाहन करत “ॐ शांती”चा जप केला.

पंतप्रधान म्हणाले, “हे हल्ले केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हते, तर भारताच्या आत्म्यावर होते. त्यांच्या या कृत्यांचा तीव्र निषेध करत आम्ही त्यांना अशी शिक्षा देऊ की त्यांची कल्पनाही होणार नाही. भारताची स्पिरिट कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही. देश एकसंघ आहे, आणि यातून आम्ही अजून मजबूत होऊन बाहेर पडू.”

जगाला उद्देशून इंग्रजीत भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”India will identify, track and punish every terrorist and their backers.”
याचा अनुवाद करताना ते म्हणाले, “ज्यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घातलंय, त्यांनाही आम्ही शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे युद्ध केवळ बंदुकांचं नाही, तर देशाच्या अस्मितेचं आहे. दहशतवादाचं कंबरडं मोडल्याशिवाय भारत स्वस्थ राहणार नाही.”

या कठीण प्रसंगात भारताच्या सोबत उभे राहिलेल्या प्रत्येक देशाचे आणि नागरिकांचे पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. “या संकटात ज्यांनी आमचा साथ दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. भारत हे सहनशील आहे, पण अशा हिंसेसमोर झुकणारा नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.