काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष विमानांची व्यवस्था

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आज दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या माध्यमातून एकूण १८३ पर्यटक आज संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.

( Chief Minister arranges special flights to bring back Maharashtra tourists from Kashmir)

एअर इंडियाचे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईत उतरणार असून, त्यातील प्रवाशांची यादी देखील प्रशासनाने तयार केली आहे. तसेच इंडिगोचे दुसरे विमान ८३ पर्यटकांना घेऊन येणार आहे. या दोन्ही विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समन्वय साधून मोठी मदत केली.आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली सर्व हालचाली पार पडत आहेत. गिरीश महाजन यांनी लष्करी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या ठिकाणी उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास करून आभार मानले आहेत.

या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या एकूण ५८० पर्यटकांच्या सुखरूप परतीसाठी सरकारकडून विशेष पावले उचलली जात असून, या प्रक्रियेस वेग देण्यासाठी सतत आढावा घेतला जात आहे. लवकरच उर्वरित पर्यटकांनाही राज्यात परत आणण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य सरकार, संरक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्या समन्वयातून चाललेल्या या प्रयत्नांमुळे संकटात अडकलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्रातील एकही नागरिक तिथं अडकून राहणार नाही, हे आमचं वचन आहे. केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही सर्वांना सुखरूप घरी परत आणणार आहोत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.