विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘वेव्हज २०२५’ (WAVES 2025) या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेटा’ (META) या अग्रगण्य टेक्नॉलॉजी कंपनीच्या पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी मेटाच्या स्मार्ट ग्लासेसचा (Meta Smart Glasses) थेट अनुभव घेतला. हे चष्मे मेटा आणि प्रसिद्ध ब्रँड रे-बॅन (Ray-Ban) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत. ( Chief Minister Devendra Fadnavis visits ‘Meta’ pavilion; Experiences new era of technology)
या स्मार्ट चष्म्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच वापर करणाऱ्याला पूर्णतः डिजिटल अनुभवात सामावून घेणाऱ्या प्रणालींचा थेट अनुभव घेतला. दृश्य, आवाज आणि संवेदना यांच्या अद्वितीय मिश्रणातून उभा राहणारा हा अनुभव महाराष्ट्राच्या डिजिटल प्रगतीची दिशा दर्शवतो, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्र हा देशाचा नवतंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू बनत आहे. अशा स्मार्ट आणि स्टायलिश डिव्हाइसेस केवळ तंत्रज्ञानाची प्रगती दर्शवत नाहीत, तर आपल्या जीवनशैलीचा भागही बनत आहेत.
यासोबतच त्यांनी मेटाच्या स्टॉलमध्ये डिजिटल स्टोरीटेलिंग, व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञान, एआयद्वारे कंटेंट निर्मिती अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. या सगळ्या तंत्रज्ञानांचा वापर शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात कसा करता येईल, यावरही त्यांनी चर्चा केली.
वेव्हज २०२५ हा शिखर मेळावा भारताच्या ‘क्रिएट इन इंडिया’ या व्हिजनसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामध्ये भारतात निर्माण होणाऱ्या कंटेंट, तंत्रज्ञान, संगीत, गेमिंग, आणि स्टोरीटेलिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा उद्देश आहे.
