सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कन्नड भाषिकांचा संताप ; एफआयआर दाखल

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंगळुरूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका संगीत कार्यक्रमात कन्नड गाण्याच्या मागणीवरून दिलेल्या ‘पहलगाममध्ये म्हणून युद्ध झालं’ या वक्तव्यानंतर कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्याचे सांगत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Kannada speakers angered over Sonu Nigams controversial statement FIR filed)

सोनू निगम एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणी सादर करत असताना, प्रेक्षकांमधील एका चाहत्याने सतत कन्नड भाषेतील गाणं गाण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला सोनूने दुर्लक्ष केलं, मात्र संबंधित व्यक्तीने आवाज चढवत धमकीसदृश वर्तन केल्यावर सोनूने चिडून म्हटले –”हेच कारण आहे की पहलगाममध्ये युद्ध झालं!”

या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सोनू निगमने एका स्थानिक भाषेच्या गाण्याच्या मागणीचा संबंध थेट जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनेशी जोडल्यामुळे त्याच्या या असंवेदनशील विधानावर संतापाची लाट उसळली.

समाज माध्यमांवर सोनू निगमच्या वक्तव्याचा तीव्र निषेध होत असून, कर्नाटकातील एका कन्नड समर्थक कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल करत एफआयआर नोंदवला आहे. या तक्रारीत सोनू निगमवर स्थानिक भाषिकांच्या भावना दुखावल्याचा आणि समाजात तणाव निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनू निगमकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कार्यक्रमाचे आयोजकही या वादामुळे अडचणीत आले असून, स्थानिक पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे.

घटनेनंतर काही नागरिकांनी सोनूला पाठिंबा देत म्हटले की, कलाकारांना धमकावून गाणं गाण्यास लावणं चुकीचं आहे. मात्र त्याचवेळी, एक गंभीर दहशतवादी घटनेचा संदर्भ देऊन प्रतिक्रिया देणंही अत्यंत अनावश्यक आणि निषेधार्ह असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.