विशेष प्रतिनिधी
चौंडी: महाराष्ट्र आणि हिंदू धर्म जागृत ठेवण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे, असा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. ( Chief Minister praises Ahilyadevi Holkars work in keeping Maharashtra and Hinduism alive)
मुख्यमंत्री म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत. जो सर्व भाषांमध्ये तयार असेल. केवळ महाराष्ट्र आणि मध्य भारतातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये दक्षिणेपासून उत्तरेकडे आणि पश्चिम पासून पूर्वेकडे सर्व भागात अहिल्यादेवी यांचे चरित्र, त्यांचे कार्य, त्यांचे कर्तुत्व आणि समाजावरील त्यांचे उपकार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी असे दोन्ही ठिकाणी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही आमंत्रण द्यायला गेल्यावर त्यांनी सांगितले की, मी यावेळी कर्मभूमीवर म्हणजे मध्य प्रदेश मधील कार्यक्रमाला जाण्याचे आधीच ठरवलेले आहे. त्यामुळे जन्मभूमीवर मी पुढच्या वेळी नक्की येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पुढील काळात लवकरच राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील येथे दर्शनासाठी येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
चौंडी हे गाव अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव आहे. हे खऱ्या अर्थाने प्रेरणा आणि ऊर्जा केंद्र असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, या देशांमध्ये जेवढी कल्याणकारी राज्ये झाली. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर दुसरे नाव कोणाचे घ्यायचे, असेल तर ते अहिल्याबाई होळकर यांचेच घ्यावे लागेल. भारतावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या आक्रांत्यांना माहिती होते की, भारताची ताकत ही भारताच्या अध्यात्मात आहे. भारतीयांची ताकद भारतीयांना आत्माची भावना देते. ही ताकद इथल्या मंदिरांमध्ये आणि घाटांमध्ये आहे. त्यामुळेच हे सर्व प्रेरणा स्त्रोत संपवण्याचा प्रयत्न परकीय आक्रमणकर्त्यांनी केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाने तोडलेले सोमनाथ मंदिर पुन्हा बांधण्याची कोणत्याही राजाची हिम्मत झाली नाही. मात्र ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन जागा मिळवून अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिर बांधले. अहिल्या मातेला अपेक्षित असलेलाच विकास आज देशात झालेला दिसत आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा विकास हा त्या प्रमाणेच झाला आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. तो पाहिल्यानंतर अभिमानाने उर भरून येत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
