विशेष प्रतिनिधी
बारामती: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका विधानामुळे ही चर्चा सुरू झाली.पण आता शरद पवारांनीच या चर्चेविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. ( Sharad Pawars reversalhands over ears regarding merger)
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने एका व्यासपीठावर येत आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शरद पवारांनी एका मुलाखतीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर राष्ट्रवादीच्या भावी पिढीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सूतोवाच केले होते. तसेच यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोडला होता. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रखडली असल्याचा दावा केला होता.
शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर प्रश्न केला. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी ‘मला माहिती नाही’ अशी अवघ्या 3 शब्दांची प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर अजित पवार गटाचे नेते नाराज असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांचा या एकीकरणाला विरोध आहे. त्यांच्या मते, दोन्ही गट एकत्र आले तर पक्षात सत्ता व पदांचे वाटप अधिक कठीण व क्लिष्ट होऊ शकते. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील पदांसाठीची स्पर्धाही टोकाची होऊ शकते. प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांच्यात यावरून वाद होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही दोन्ही गटांत संभ्रमावस्था असल्याचा दावा केला जात आहे. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार की ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढेही काम करणार? असा पेच या प्रकरणी फसला आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा कोणताही औपचारिक प्रस्ताव अद्याप आला नसल्याचे नमूद करत यासंबंधीची चर्चा फेटाळून लावली होती. दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले होते.
दुसरीकडे, शरद पवारांनी स्वतः विलिनीकरणाच्या मुद्यावर पक्षात दोन गट पडल्याचे मान्य केले आहे. एका गट विलिनीकरणाच्या बाजूने असून, दुसरा गट संघर्ष करण्याच्या तयारीत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच यावर पक्षाच्या नव्या पिढीलाच निर्णय घ्यायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे.
