विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपी नीलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. नीलेश चव्हाणला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
( Nilesh Chavan remanded in police custody till June 3 in Vaishnavi Hagavane case)
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. त्याने पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला होता. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला काल रात्री पुण्यात आणले गेले. त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. आज सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअॅप संदेश आणि चॅट्सचा तपास सुरू केली आहे. नीलेश चव्हाणच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे, आणि पोलिसांनी उर्वरित आरोपींबाबतही तपास सुरू केला आहे. यात वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या दिवशी नीलेश हा शशांक हगवणेच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
नीलेश चव्हाण हा वैष्णवीच्या नणंदेचा मित्र असून, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तो 21 मेपासून फरार होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात पथकांची स्थापना करून, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर, नेपाळ सीमेवरील महाराजगंज जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. फरार असताना त्याने मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता.
