विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २३ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
( Fake currency printing gang busted in Mumbai Two accused arrested notes worth over Rs 23 lakh seized)
ही धक्कादायक घटना मालवणी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ उघडकीस आली. उपनिरीक्षक दीपक हिंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही जण या भागात बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळताच वरिष्ठ निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने सापळा रचून रंगेहाथ दोन आरोपींना ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. आरोपींकडून १,७४० बनावट नोटा, एक लॅपटॉप, कलर इंकजेट प्रिंटर, विशेष प्रकारची इंक आणि इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे २५ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
संपत सामवय्या एंजलपल्ली (वय ४३) आणि रहीमपाशा याकूब शेख (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे.हे दोघेही तेलंगणाचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी बनावट नोटा छापून त्या विविध शहरांमध्ये वितरित करण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस तपास सुरु असून, या रॅकेटचे जाळे किती राज्यांमध्ये पसरले आहे, त्यांच्या संपर्कात आणखी कोणी आहे का, आणि बनावट नोटा कुठे वापरण्यात आल्या होत्या, याचा सखोल तपास मालवणी पोलिसांकडून केला जात आहे. या कारवाईमुळे देशांतर्गत बनावट चलन प्रसार रोखण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे मानले जात आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपींनी वापरलेली छपाई पद्धत ही अत्यंत कुशल होती आणि बनावट नोटा पाहताना त्या खऱ्या नोटांप्रमाणेच भासत होत्या. त्यामुळे, सामान्य नागरिकांना सहज फसवता येईल, अशा प्रकारे हे बनावट चलन तयार करण्यात येत होते.
मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, बनावट नोटा सापडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
