विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून आणखी तीन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. किल्ल्यावर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ( Sinhagad Fort closed for tourists Work to remove unauthorized constructions continues)
३० मेपासून किल्ला बंद ठेवण्यात आला होता. सुरुवातीला काही दिवसांतच काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अडथळ्यांमुळे कामाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज शनिवार असूनही अनेक पर्यटकांनी किल्ल्याकडे मोर्चा वळवला, मात्र त्यांना माघारी जावे लागले.
प्रशासनाने पर्यटकांना पुढील सूचना येईपर्यंत सिंहगड किल्ल्यावर येणे टाळण्याचे आवाहन केले आहे. काम पूर्ण होताच किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
