मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवार नाराज; म्हणाले, “जे बोलायचं ते कॅबिनेटमध्ये बोला!”

विशेष प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या सार्वजनिक वक्तव्यांवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट शब्दांत सांगितले की, “जे काही बोलायचं असेल, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोला. बाहेर बोलल्याने गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्यांना उधाण येतं.

( Ajit Pawar upset over ministerscontroversial statements; saidSay whatever you want to say in the cabinet)

महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “जर काही तक्रार असेल, तर ती मंत्रिमंडळासमोर मांडा. आम्ही एकोप्याने कारभार करत आहोत. छोट्या गैरसमजांमुळे पक्षांतर्गत आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होतो, तो टाळला पाहिजे.”

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वादग्रस्त संभाषणाचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले, “हे संभाषण अत्यंत खालच्या पातळीचं होतं. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचा संवाद असू नये. प्रत्येक नेत्याने तारतम्य बाळगलं पाहिजे. काही लोकांमध्ये विकृती असते, त्यांना महत्त्व देऊ नये. मात्र, जर आरोपांमध्ये तथ्य असेल, तर सरकार योग्य ती कारवाई करेल.”

जिल्हा परिषद बांधकाम विभागांमधील अनियमितता लक्षात घेऊन डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. “बिल अडवण्याच्या तक्रारी अनेकदा होतात. यावर आता पूर्णविराम मिळणार आहे.त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर त्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्याला सर्व रक्कम मिळेल, यासाठीही डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. ग्रामपंचायतीतील घरपट्टी कर भरण्यासाठी क्यूआर कोड सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरात बसूनही गावातील घराचा कर भरता येणार आहे. जिल्हा परिषद विभागातील माहिती आता व्हॉट्सॲप चॅटबॉटवरही उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

“अंगणवाडीसाठी एक स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याचा थेट फायदा लाडक्या बहिणींना होणार आहे,” असे सांगत पवारांनी अंगणवाडी व्यवस्थापनाच्या डिजिटायझेशनकडे लक्ष वेधले.

लाडकी बहीण योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आधीच भूमिका मांडली आहे. तीच अंतिम मानली पाहिजे. कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही. आम्ही बहुमताने निवडून आलेलो आहोत. अर्थसंकल्पात सामाजिक न्याय व आदिवासी विभागासाठी ३९ ते ४१ टक्के वाढीव निधी दिला आहे.”

पवारांनी स्पष्ट इशारा दिला की, “बीड असो किंवा अन्य कोणतेही ठिकाण, कोणी चुकीचे वागले, तर कारवाई नक्कीच होईल. नियम सगळ्यांसाठी समान आहेत.”

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांबाबत पवार म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही स्वतंत्र पक्षांचे प्रमुख आहेत. युतीसंदर्भातील निर्णय त्यांच्या अधिकारात आहे. आपण किंवा पत्रकार यावर चर्चा करून काही ठरवू शकत नाही.”

यावर पत्रकारांना मिश्कील टोला मारताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी आम्हाला मध्येच अडवता, मग पुढे दांडकी करता आणि त्यावरच विचारत बसता!”