विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेपासून पलटी मारली आहे. काही महिन्यांपूर्वी राऊत यांनी राज ठाकरे यांचं शिवाजी पार्क येथील घर ‘कॅफे’ असल्याचा उल्लेख करत भाजप व इतर नेत्यांच्या भेटीवर टोला लगावला होता. तेच राऊत सांगू लागले आहेत की “राज ठाकरे यांचं घर आमचं दुसरं घर आहे!” ( Raj Thackerays house is our second homeSanjay Rauts reversal due to MNS-Thackeray alliance talks)
पूर्वी राज ठाकरे यांचं शिवतीर्थ वरील निवासस्थान हे केवळ ‘चहापाणीचं ठिकाण’ आहे अशी उपहासात्मक टीका करणारे संजय राऊत आता युतीच्या शक्यतेमुळे ‘ते आमचं दुसरं घर आहे’ असे म्हणताना दिसत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना मनसे – ठाकरे गट युतीबाबत राऊत म्हणाले की, नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. आम्ही सकारात्मक आहोत, राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि आम्ही त्यांचे सहकारी अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला असेल. त्यामुळे यासाठी चिंतेचे कारण नाही. मी या दोन्ही भावांना पाहिले आहे. त्यामुळे 10 मिनिटांनी मी राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना फोन करणार आहे, असे हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करनार नाही ना. काय सांगावे फोन झाले सुद्धा असतील.
अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिले आहे. जसे आमचे आदित्य ठाकरे आहेत, तसे अमित ठाकरे आहेत. त्याची विधानेही फार गोड आहेत. त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, त्या भावनेचा मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. हल्ली त्यांची विधान फार चांगली आहेत. आदित्यची भूमिका उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन हवे आहे. मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे.
