विशेष प्रतिनिधी
मुंबई : लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, त्यांचा आणखी उत्कर्ष झाला पाहिजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. हे पूर्ण करण्यासाठी भाजपा आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेने लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 0 टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबै बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कर्जपुरवठा करण्यात येत होता. याकरिता 9 टक्के व्याज आकारण्यात येत होते. पण आता 9 टक्के व्याजाचा नियम बाद करण्यात आला असून 0 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
मुंबै बँकेने घेतलेल्या या निर्णयानुसार, एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबै बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायासंदर्भातील तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचे ज्या पद्धतीने केले, तसेच हेही सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, त्यामध्ये 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर, 1 लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत, असेही यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
