अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाही, तर ती अंतिम माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी प्रभावी यंत्रणा आहे लोकशाहीत या अंदाज समितीचे योगदान महत्वाचे असल्याचे   प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले. ( Chief Minister Devendra Fadnavis asserts that the contribution of the Estimates Committee is important in fulfilling the hopes and aspirations of the final constituents.)

भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित देशभरातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जैसवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, सर्व राज्य, संघराज्य क्षेत्रांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राक्कलन” हा शब्द संस्कृतमधून आलेला असून ‘पूर्वीची गणना’ म्हणजेच अंदाज होय. सरकारचे अंदाजपत्रक सादर होते, तेव्हा त्यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया असते. विभागांना निधी देताना त्यांच्या योग्य विनीयोगावर अंकुश ठेवणारी यंत्रणा असणारी  अंदाज समिती अत्यंत प्रभावी भूमिका बजावते. ही समिती केवळ शिफारसी करत नाही, तर ती सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासही भाग पाडते. महाराष्ट्रात अंदाज समितीच्या सुमारे 65 ते 70 टक्के पेक्षा अधिक शिफारसींची अंमलबजावणी होते, ही  अत्यंत सकारात्मक बाब आहे.

प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण करून शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा संस्कार घडवणाऱ्या समितीमुळे अचूक कामकाजाबाबत प्रशासनाला जाणीव राहते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री  म्हणाले, अंदाज समितीमुळे लोकशाही व्यवस्था सक्षम होते. प्रशासनातील कार्यपद्धती तपासणे, धोरणांचे मूल्यांकन करणे आणि अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचतात का, हे पाहणे या समितीच्या माध्यमातून शक्य होते. समित्या सरकारवर अंकुश ठेवणारे माध्यम आहे. अधिवेशनाच्या बाहेरही या समित्या बाराही महिने काम करत असतात. यामुळे प्रशासन अधिक गतिमान होते.

या अमृतकाळात आपण सर्वांनी मिळून या समितीला अधिक सक्षम, प्रभावी आणि परिणामकारक कसे करता येईल, यावर विचार केला पाहिजे. भविष्यातील पुढील पिढ्यांसाठी आदर्श मानके निर्माण करण्याचे हे सुवर्णसंधीचे वर्ष आहे, असेही मुख्यमंत्री .फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *