विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना वापरलेले “षंढ” हे वक्तव्य आता त्यांच्या अडचणी वाढवू शकते. सत्ताधारी आमदारांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असून, विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
( Will Action Be Taken Against Sandeep Deshpande for Calling Ruling Party Members Impotent Privilege Motion Likely After Controversial Remark)
देशपांडे यांनी म्हटले की, “सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील, तर मराठी माणसाने करायचे काय? तुम्ही जर खरे मराठी असाल, तर रस्त्यावर उतरा.” त्यांचे हे विधान केवळ आक्षेपार्ह नसून विधिमंडळाच्या सदस्यांचा अवमान करणारे असल्याचे मानले जात आहे.
देशपांडे म्हणाले, मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हे तुम्ही विसरू नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे यांनी म्हटले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये सरकारने याबाबतचा सकारात्मक निर्णय घ्यावा, सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर उतरून आम्ही तांडव करायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणे सरकारला कठीण होईल.
या प्रक्षोभक विधानाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी तीव्र शब्दांत देशपांडेंवर निशाणा साधला. “आज सभागृहात देशाचे लोकसभा अध्यक्ष उपस्थित होते, त्यांनाही ‘षंढ’ म्हणणे योग्य आहे का? सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि आम्ही जे सदस्य बसलो आहोत, त्यांनाही तुम्ही ‘षंढ’ म्हणणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाटील म्हणाले की, “सभागृह हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. अशा ठिकाणी अशोभनीय भाषा वापरणे म्हणजे संपूर्ण सभागृहाचा अपमान आहे. आम्ही शांत आहोत, पण वेळ आली तर उत्तर देण्याची आमचीही तयारी आहे.”
येत्या अधिवेशनात संदीप देशपांडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. अनेक आमदारांत संतापाची भावना असून, ‘मर्यादा ओलांडल्यास कायद्याचा बडगा उगारला जाईल’ हे संकेत मिळत आहेत.
