विशेष प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ( One crore fraud with the lure of investment in the stock market)
याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक पाषाण भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक काम करणाऱ्या संस्थेतील प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी व्यावसायिकाला दाखविले होते. व्यावसायिकाला सोशल मिडियातील एका समुहात सहभागी करून घेतले. गुंतवणूक विषयक योजनांची माहिती त्यांना देण्यात आली.
त्यानंतर व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांच्या खात्यात परताव्यापोटी दिली जाणारी रक्कम जमा केली नव्हती. परतावा मिळाल्याने व्यावसायिकाने आणखी रक्कम गुंतविली. गेल्या चार महिन्यात सायबर चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. पैसे परत करण्याबाबत त्यांनी चोरट्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.
