पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी आता अँटी करप्शन ब्युरो (ACB) तुमच्या दारी येत आहे. होय, जर कोणताही अधिकारी किंवा मध्यस्थ व्यक्ती तुमच्याकडे लाचेची मागणी करत असेल, तर आता तुम्हाला तक्रार देण्यासाठी पुण्यात एसीबी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ( ACB at Your Doorstep to Curb Bribery!)
कारण आता अँटी करप्शन ब्युरोच तुमच्या दारी येत आहे. 13/10/2025 ते 16/10/2025 या कालावधीत संपूर्ण पुणे जिल्ह्यात अँटी करप्शन कायद्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
या विशेष जनजागृती कार्यक्रमा दरम्यान, एसीबीचे अधिकारी त्यांच्या पथकासह खाली दिलेल्या तारखांना तालुक्याच्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित राहतील. तेथे अधिकारी परिसरातील समाजसेवक, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी तसेच एसीबीकडे यापूर्वी तक्रार केलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेतील.
दरम्यान, अँटी करप्शन ब्युरो विभागाने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट तुमचे शासकीय काम करण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने तक्रार दाखल करावी. तुमची तक्रार जागेवरच स्वीकारली जाईल आणि त्वरित पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, जेणेकरून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करता येईल.
