अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांची काल मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. 7 दिवसानंतर बेस्टचा संप मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्याने हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आझाद मैदानात एकत्र येत हा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार सेनेने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संबंधी आज संध्याकाळी घोषणा करतील. आजपासून हे सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील. मुंबईकरांसाठी दिलासा देणारी ही मोठी बाब आहे.मुंबईतील 18 आगारातील कर्मचारी काम आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला. लोकल सेवेप्रमाणे बेस्टला सुद्धा मुंबईची लाईफलाइन म्हटलं जातं. कारण दररोज लाखो मुंबईकर बेस्टच्या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. घरातून स्टेशन किंवा नोकरीच ठिकाण गाठण्यासाठी बेस्ट सेवेचा वापर केला जातो. बेस्टची सेवा पूर्ववत होणार ही मोठी दिलासादायक बाब आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात येईल. पण त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त यांची बैठक घेण्यास सांगीतले आहे. तसेच या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.या सोबतच वार्षिक रजा या भर पगारी करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांनी वार्षिक बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ वाढ मिळावी. तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी मोफत पास देण्याची सुविधा देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.
बेस्ट कंत्राटी कामगारांच्या ‘या’ मागण्या मान्य
कामगारांचे ( Basic Salary ) पगार 18,000 ( अठरा हजार ) करण्यात येणार
कामगारांच्या वार्षिक रजा ( CL / SL / PL ) भरपगारी करण्यात येणार, प्रवास मोफत देणार
कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा
कामगारांना साप्ताहिक रजा ही भरुन मिळणार
कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना देणार
संप काळातील सात दिवसांचा पगार मिळणार
