भीष्म पितामहांकडून ही अपेक्षा नाही; संजय राऊतांनी थेट शरद पवारांना केलं लक्ष्य

राज्यात आगामी निवडणूकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यादम्यान महाविकास आघाडीत मात्र धुसफूस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवारांशी गुप्त बैठक केली. या बैठकीवरून मविआमधील घटकपक्ष उद्धव ठाकरे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

या भेटीमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहाता शरद पवारांनी स्पष्टीकरण देताना “अजित पवार माझे पुतणे आहेत. त्यांनी भेट घ्यायला काय हरकत आहे”, अशा आशयाचं विधान केलं. त्यापाठोपाठ रोहित पवारांनीही राजकारणात नातीगोती सांभाळण्यासंदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष्य केलं आहे.लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम येईल असं नेतृत्व निदान भीष्म पितामह यांच्याकडून तरी होऊ नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे लोकं आहोत. नातीगोती, प्रेम घरामध्ये. आमच्यासमोर आव्हान उभं केलं गेलं आहे. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून कोणी हातमिळवणी करत असेल तर ते आमचे नातेवाईक नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

सामनातून या वृत्तपत्रातून याभेटीवर टीक करण्यात आली.राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही,असे म्हणत ‘सामना’तून पवारांच्या गुप्तभेटीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही. दोन पवारांची ‘गंमतभेट’ आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही असे म्हणत शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीवर सामनातून हल्लबोल करण्यात आल आहे.

अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर महाविकासआघाडीत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळालं आहे. पवारांच्या बैठकीनंतर जनतेत संभ्रम निर्माण झालाय, असं मविआ नेत्यांनी स्पष्ट सांगितलं तर याबाबत पवारांशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. रविवारी मातोश्रीवर नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली. या बैठकीत गुप्त बैठकीवर चर्चा झाली आहे.