मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मुंबईत कार्यक्रम आखण्यात आले होते. तर, मुंबईकरही मोठ्या उत्साहात नववर्ष साजरे केले. 2024 या नव वर्षात मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईत सुरु असणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प या वर्षाअखेरीस नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अन्य प्रकल्पाची कामही वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वाहतुकीला नवी दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) पहिला टप्पा खुला होणार आहे. वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्हदरम्यानच्या मार्गिका या टप्प्यात खुल्या होणार आहेत.मुंबई महापालिकेकडून मरिन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण केला जात आहे. या प्रकल्पातील मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका फेब्रुवारी 2024 पर्यंत सेवेत येणार आहेत. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांत शक्य होणार आहे. सागरी किनारा मार्गाबरोबरच अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारी 2024 नंतर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूलही डिसेंबर 2024 पर्यंत सेवेत येईल. मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारत असतानाच कोस्टल रोडवरील एक महत्त्वाची मार्गिका खुली होणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सहा मार्गिकांचा हा मार्ग 21.8 किमी लांबीचा असून, मुंबईला थेट न्हावा शेवा येथील चिरले या गावाला जोडतो. तब्बल 17, 843 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. याचे काम 2018 मध्ये सुरू झाले. आता केवळ रंगरंगोटी आणि इलेक्ट्रिक पोल लावण्याचे काम बाकी आहे. जे लवकरच पूर्ण होईल. उद्घाटन झाल्यावर हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्री पुल असेल. यामुळे नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा हायवे हे अंतर फक्त 20 मिनिटांवर येईल.
एमएमआरडीएकडून शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू हा बहुचर्चित पुल येत्या 12 जानेवारी 2024 रोजी प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या पुलामुळं मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. शिवडी ते चिर्ले असा हा 21 किमी लांबीचा मार्ग आहे. या पुलाचा 16 किमीचा भाग समुद्रावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होण्याची माहिती समोर येतेय.
विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम पूर्ण झाल्यानंतर सरकार रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एमएमआरचे सध्या सुरू असल्याचे सर्व प्रकल्प जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार-अलिबाग, शिवडी- न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंकसह अनेक प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत.कॉरिडोरचे बांधकाम पूर्ण झाल्यास विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड- दोन तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास 4 ते 5 तासांचा आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्वी एमएमआरडीएकडे होती. मात्र, भूसंपादनाच्या कामाला जास्त वेळ लागल्याने ही जबाबदारी एसएसआरडीसीकडे सोपवण्यात आली आहे.
